Independence Day special : दिंडेंच्या जिलेबीची ६५ वर्षांची परंपरा


स्वातंत्र्य दिन विशेष : पेठ वडगावच्या दिंडे कुटुंबाच्या जिलेबीची सर्वांनाच भुरळ

'स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन तोंड गोड करून साजरा करायचा तो दिंडेंच्या जिलेबीनेच' असा प्रघातच पेठ वडगाव (जि. कोल्हापूर) पंचक्रोशीत पडला आहे. इतकी दिंडेंची जिलेबी लोकप्रिय आहे. ही जिलेबी खरेदी करण्यासाठी अक्षरशः सकाळी सहापासूनच रांगा लागतात. 

- भारतभूषण केशव गिरी,

कदमवाडी, कोल्हापूर. 

मो. 9881703227

पेठ वडगावातील दिंडे परिवाराची ही खास जिलेबी हातात घेतल्यावर टणक लागत असली तरी तोडात खुसखुशीत, नकळत आबट पण मधूर, स्वादिष्ट लागते. यामुळे जवळपास २२ गावातील लोक भल्या सकाळपासूनच दिंडेंची जिलेबी खरेदीसाठी गर्दी करतात.

पेठ वडगांव येथील पत्रकार विवेक यशवंत दिंडे आणि त्यांच्या एकत्र कुटुंबातील सर्वजण राष्ट्रीय सण गोड करण्यासाठी दहा पंधरा दिवस जिलेबीच्या तयारीला लागतात. या सर्वांना मार्गदर्शन असते विवेकचे वडील यशवंत, आई बनूबाई आणि चुलतभाऊ अशोक यांचे. विवेकचे आजोबा नानासाहेब दिंडे यांनी शंभर वर्षांपूर्वी प्लेग साथीच्या वेळी कवठेपिराण हे मूळ गाव सोडले. त्यांनी वारणा नदीच्या पलिकडे असलेल्या पेठ वडगांवात येऊन बाजारपेठेत खानावळ सुरू केली. सचोटीने खानावळ चालविल्याने समृध्दीही लवकरच आली. या उत्साहातच आजोबा नानासाहेब आणि चुलते भीमराव यांनी स्वातंत्र्य दिनाच्या आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जिलेबी तयार करून विक्री सुरू केली. पुढे पुढे ही जिलेबी इतकी लोकप्रिय झाली की जिलेबी खरेदी करण्यासाठी आलेल्या लोकांना आवरणे कठीण होऊ लागले. दिंडेंचा हॉटेल व्यवसाय बंद झाला, मात्र राष्ट्रीय सणांदिवशी जिलेबी विक्री जोमात सुरू आहे. 


जिलेबी व्यवसायात तिसरी पिढी

दिंडेंची आता जिलेबी व्यवसायात तिसरी पिढी आहे. तरीही चव तीच आणि स्वादही तोच आहे. जिलेबी तयार करताना मैदा भिजविणे आणि पाक तयार करणे हे फार कौशल्याचे काम असते. हे कसब दिंडे कुटुंबीयांनी अनेक वर्षांच्या अनुभवातून साध्य केले आहे. पीठ असं भिजवायचं की जिलेबी जास्त आंबट होऊ नये, एकसंध रहावी, खुसखुशीत व्हावी. पाक असा तयार करायचा की तळलेली जिलेबी, नकळत आंबट असलेली जिलेबी पाकात पडताच स्वादिष्टपणा आणि गोडसरपणा यावा. शिवाय अधिक खुसखुशीतही व्हावी. 

पीठ भिजवण्याचे काम विवेकचे मोठे भाऊ नितीन करतात. ही क्रिया नितीनदादांना अचूक साधते. जिलेबीचे पीठ योग्य प्रमाणात भिजल्याने गाळताना तुटत नाही आणि जिलेबी आंबटही होत नाही. तेलात तळल्यानंतर ती चांगली भाजली जाते. भाजलेली जिलेबी वेगळ्या पध्दतीने केलेल्या साखरेच्या पाकात सोडली जाते. पाक पूर्णपणे जिलेबीत मुरल्यावरच जिलेबी खवय्यांना दिली जाते. दिंडेंच्या जिलेबीची चव खवय्यांच्या जिभेवरून आणि जिभेद्वारे सर्वदूर पोहोचते. सांगली, कोल्हापूर येथून जिलेबी नेण्यासाठी लोक येतात. 

पहाटेपासूनच राबते अख्खे कुटुंब

अलिकडच्या काही वर्षांपासून जिलेबीला मागणी वाढल्याने दिंडे आता दोनशे किलो मैदा चार दिवस आधी भिजवतात. पाकासाठी त्यांना चारशे किलो साखर लागते. ते पहाटे साडेचार वाजल्यापासून जिलेबी गाळायला सुरू करतात. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत जिलेबी संपते. यासाठी घरची पन्नास लोक सतरा - अठरा तास राबतात. जिलेबी मिळाली नसल्याने अनेकजण नाराज होऊन परततात. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्यासाठी परत पाच - सहा दिवसांनी जिलेबी काढतात.

तर मित्रांनो, इतकं वाचल्यानंतर आता तुमच्याही तोंडाला पाणी सुटले असेल नाही का! पण दिंडेंच्या जिलेबीसाठी वेटिंग करावे लागते बर का !

(लेखक पर्यावरण कार्यकर्ता, पत्रकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत.)

Independence day, Dinde family from Peth Vadgaon, Dinde's Jalebi, Kolhapur district.

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या