वाईचे चतुरस्त व्यक्तिमत्व हरपले; साहित्य, नाट्य क्षेत्रावर शोककळा
Satara News : वाईतील प्रतिथयश डॉक्टर, प्रतिभावान लेखक - कवी, अनुवादक, वक्ते, कथाकार, विज्ञान लेखक, रंगकर्मी डॉ. शंतनू शरद अभ्यंकर (वय ६०) यांचे आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली त्यांची झुंज अखेर व्यर्थ ठरली. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा व एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
डॉ. अभ्यंकर यांनी आयुष्यभर वैद्यकीय सेवा करता करता साहित्य सेवाही केली. लेखक, कवी, विज्ञान लेखक, प्रभावी वक्ता, रंगकर्मी अशा भूमिकांमध्ये ते लीलया वावरले. अनेक संस्थांमध्ये कार्यरत असणारे असे उत्तुंग बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या चतुरस्त व्यक्तिमत्त्वाची मोहिनी नेहमीच सर्वांवर राहिली. महिलांच्या आरोग्याच्या संदर्भात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन २००७ मध्ये महाराष्ट्र शासनाने त्यांचा डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मान केला होता.
अखेरपर्यंत आवडीच्या क्षेत्रात कार्यरत
गेल्या दोन वर्षांपासून कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी ते धीरोदात्तपणे लढत होते. एवढा गंभीर आजार होऊनही त्याला शांतपणे तोंड देत अखेरपर्यंत ते आपल्या आवडीच्या क्षेत्रात कार्यरत राहिले. सन २०२२ च्या एका दिवाळी अंकात त्यांनी स्वतःला कॅन्सर डिटेक्ट झाल्याविषयी एक भावपूर्ण तरी तटस्थतेने एक लेख लिहिला होता. त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.
अलीकडेच प्रकृती ढासळल्यामुळे त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते. तेथे आज त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांचे पार्थिव वाई येथे त्यांच्या मधली आळीतील निवासस्थानी आणण्यात येणार आहे. रात्री नऊ वाजता त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्याने
स्वातंत्र्यदिनी जगाचा निरोप घेतला !अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खंदा पुरस्कर्ता आज स्वातंत्र्यदिनी निधन पावला, हा योगायोग म्हणायचा की काय म्हणायचे, काही समजत नाही, जीवन कसं जगावं याचा आदर्श वस्तुपाठ म्हणजेच डॉ. शंतनू अभ्यंकर होय. त्यांची इच्छाशक्ती पाहता हा पठ्ठ्या निश्चितच कॅन्सरला मात देणार असे वाटत होते अशा असंख्य भावस्पर्शी शोकभावना डॉ. अभ्यंकर यांच्या निधनाबद्दल समाज माध्यमातून व्यक्त होत आहेत.
Dr. Santanu Abhyankar, Wellknown author in Wai
Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.
पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.
आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613
0 टिप्पण्या