National News : ... छे, ती तर पायल जाधव !


तो व्हिडिओ रेखा गुप्तांचा नव्हेच; तसे भासवण्याचा प्रयत्न

National News : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा जुना व्हिडिओ म्हणून सध्या समाज माध्यमांवर फिरवला जात असलेला व्हिडिओ मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा नव्हे, तर पायल जाधव या मराठमोळ्या अभिनेत्रीचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. खुद्द पायलनेच याविषयी इन्स्टावर पोस्ट टाकून, कोणीही चुकीच्या माहितीचा प्रसार करू नये असे आवाहन केले आहे.

पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत एक तरुणी सडारांगोळी करण्यासोबतच लाठीकाठी, तलवारबाजी या शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर करत असल्याचा हा व्हिडिओ या दोन दिवसात समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. 'She is Rekha Gupta - CM of Delhi' अशा कॅप्शनसह हा व्हिडिओ व्हायरल करून त्या रेखा गुप्ता असल्याचे भासवले जात आहे. 

नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर भाजपने रेखा गुप्ता यांना बसवले आहे. आपला पक्ष कसा अन्य पक्षांपेक्षा वेगळा आहे, खूप वेगळी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तिमत्वाला आपल्या पक्षात कशी मोठी संधी दिली जाते हे भासवण्यासाठी भाजप, संघ परिवाराकडून विविध फंडे वापरले जातात. त्याच पद्धतीने जनमानसावर प्रभाव टाकण्यासाठी या तरुणीच्या व्हिडिओचा वापर करण्यात आला आहे. 

भाबडी जनता ठेवते विश्वास

लोकांवर प्रभाव टाकण्यासाठी अशा पोस्ट फॉरवर्ड केल्या जातो. बहुतांश भाबडी जनताही त्यावर विश्वास ठेवून जमेल तितकी ती पोस्ट फॉरवर्ड करते. आणि झालेही तसेच. मात्र या घटनेत व्हायरल केल्या गेलेल्या व्हिडिओतील तरुणी म्हणजे दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता नाहीत, तर मराठमोळी अभिनेत्री पायल जाधव आहे हे स्पष्ट झाले आहे. 

शिवजयंतीच्या निमित्ताने अभिनेत्री पायलने मराठमोळ्या वेशभूषेसह आणि या प्रसंगाला साजेशा पार्श्वसंगीतासह हा व्हिडिओ चित्रित करून तीन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. या माध्यमातून तिने छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदनाच दिली होती. मात्र हाच व्हिडिओ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचा असल्याची कॅप्शन देऊन समाज माध्यमांवर फिरवला गेला. 

पायलकडून नेटकऱ्यांना आवाहन

आपल्या व्हिडिओच्या बाबतीत भलतेच कांड झाल्याचे लक्षात आल्यानंतर पायलने शुक्रवारी रात्री उशिरा इन्स्टाग्रामवर याविषयी एक पत्र अपलोड केले आहे. या पत्रात तिने, आपण शिवजयंतीच्या निमित्ताने सादर केलेल्या युद्धकलेच्या व्हिडिओला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल नेटकऱ्यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर हा व्हिडिओ रेखा गुप्ता यांचा उल्लेख करून प्रसारित केला जात असल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. चुकीच्या माहितीचा प्रसार कुणीही करू नये असे आवाहन तिने या पत्रात केले आहे. या व्यतिरिक्त 'फॅक्ट चेक' करणाऱ्या विविध माध्यमांनीदेखील या व्हिडिओतील सत्य समोर आणत फेकूगिरीचा पर्दाफाश केला आहे.

कोण आहे पायल जाधव ?


पायल जाधव ही २६ वर्षीय उदयोन्मुख अभिनेत्री आहे. मुळची सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याची असलेल्या पायलचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेत झाले. तिचे वडील या शाळेत कर्मचारी आहेत. पुढे तिने पुणे विद्यापीठातून मास्टर्स इन हेल्थ सायन्समधून पदवीधर पदवी घेतली. त्यानंतर ललित कला केंद्रातून भरतनाट्यममध्ये ती विशारद झाली. 'अबीर गुलाल' मालिकेत तिने श्री ही भूमिका साकारली. नागराज मंजुळे प्रस्तुत, मकरंद माने दिग्दर्शित 'बापल्योक' चित्रपटातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. 

New Delhi CM Rekha Gupta, Actress Payal Jadhav, Nagraj Manjule, BJP

Get all live and latest Marathi news, Maharashtra news and all exclusive, top marathi news headlines from politics, sports, ententertainment, business, all events from satara, all cities of Maharashtra, India.

आजच्या ताज्या बातम्या  

पोस्ट आवडल्यास खालील आयकॉन्सवर क्लिक करून शेअर करा, कमेंट करा. साईटवर असलेल्या फ्लोटिंग आयकॉनवर क्लिक करून संपर्क साधू शकता.

आणखी नवनवीन बातम्या व अपडेट्स मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क - 7588638613

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या